लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिनेते आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते किरण माने यांची सोशल मीडियात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी माजी पोलिस महानिरीक्षक एस. एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत थेट भाजपचे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार आणि प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवायला हवं.” असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले ! का म्हणाले असतील?
पोलीस महानिरीक्षक हे साधं पद नाही भावांनो. या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं. एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भिक नाही मागीतली. त्यांनी एक पुस्तक लिहीलं… ‘करकरेंना का व कोणी मारले?’
त्या पुस्तकात त्यांनी काही सिक्रेटस् ओपन केली आहेत. मुश्रीफसाहेब म्हणतात, : “पाकिस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली आहे, याची डिटेल माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला १९ नोव्हेंबर २००८ रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. पुढील कारवाईसाठी ही माहिती मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळवण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही आणि हा हल्ला होऊ दिला.
प्रभाकर अलोक यांच्या मनात नक्की काहीतरी कपट होतं. यात शेकडो निरपराध लोकांचे बळी गेले… तितकेच लोक जन्मभरासाठी अपंग झाले. त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही, कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते… का??? तर उज्जवल निकम यांना माहीत होते की प्रभाकर अलोक हे आर्.एस्.एस्. च्या आतल्या गोटातले आहेत !”
पुढे ते सांगतात, : “हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून उडविलेल्या नव्हत्या असे कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिध्द झाले होते (मुंबई सेशन्स कोर्ट निकालपत्र पान नं. ९२०). त्याशिवाय करकरेंच्या पोस्ट मार्टेममध्ये स्पष्ट झाले होते की, त्यांच्या मानेपासून खाली पोटात रिव्हाॅलव्हरने पाच गोळ्या मारल्या होत्या. त्यामुळे रिव्हाॅलव्हरने गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणे आवश्यक होते. पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला नाही… कारण त्यांना माहीत होते की, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याने हे कृत्य केले आहे…आणि गोविलकर हा आर.एस.एस.शी संबंधीत आहे.”
आता ही ट्रोल्स पिलावळ मुश्रीफ यांनाही म्हणेल की “उज्जवल निकमांवर आरोप करायची तुझी लायकी आहे का?” या भक्तपिलावळीला फक्त भुंकायला सोडलंय हो. ‘छ्छू’ म्हटलं की सुटायचं. पण माझ्या भावांनो, आपल्या धडावर आपलंच डोकं आहे ना? विचार करा. बास एवढंच.
– किरण माने.