नगर: नगरमधील पुणे बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन दागिन्यांची चोरी केल्याची घटनाघडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करिष्मा समीर शेख (वय 24, रा. शाहापूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. रविवार दि. 13 फेब्रुवारीला दुपारी अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्याने फिर्यादी शेख यांचे 64 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
फिर्यादी शेख त्यांच्या पतीसह शाहापूर (ता. नेवासा) येथून पुणे येथे जाण्यासाठी नगर मध्ये आल्या होत्या. फिर्यादी शेख यांच्या पर्समध्ये एका पाकिटात 24 हजार रूपयांचे नेकलेस, 20 हजार रूपयांचे सोन्याचे गंठण आणि 20 हजार रूपयांच्या कानातील रिंगा ठेवलेल्या होत्या. शहरातील पुणे बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने शेख यांच्या पर्समधील पाकिटाची चोरी केली. एसटी बसला गर्दी असल्याचे फिर्यादी त्यांच्या पतीसह खासगी वाहनाने पुण्याकडे जाण्यासाठी बसस्थानकाच्या बाहेर आल्यानंतर पाकीटाची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.