महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांना कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे. 1 जूनपासून असे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्रीसह वाहतूकही करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय 18 लाख 876 जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.
ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे कान टॅगिंग रेकॉर्ड करते. त्यामुळं जनावरांची जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचे तपशील यासारखी माहिती यातून उपलब्ध होणार आहे. शिवाय आपत्ती काळात जनावर दगवल्यास अनुदान मिळवण्यासाठी हा टॅग आवश्यक असणार आहे. जनावरांचे टॅगिंग नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं पशुपालकांना आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करुन घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
जनावरांचे एअर टॅगींग केल्यामुळं सर्व पशुधनाची प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म मृत्यु इ. सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्याकरिता सर्व पशुधनास कानात टॅग लावुन त्याची भारत पशुधन प्रणलीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे कानात बिल्ले मारुन घेण्यासाठी त्वरित आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे