तालुक्यातील काष्टी येथील मित्राला कार मधून सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक बसल्याने यात तिघांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी रात्री एक वाजता श्रीगोंदा-काष्टी महामार्गावरील हॉटेल अनन्या समोर घडली आहे.
या अपघातात राहुल सुरेश आळेकर (वय-22, रा. श्रीगोंदा), केशव सायकर (वय-22, रा. काष्टी), आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय 18 वर्षे, रा. श्रीगोंदा) या तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा येथील राहुल आळेकर व आकाश खेतमाळीस हे आपला मित्र केशव सायकर याला काष्टी येथे सोडण्यासाठी आपल्या कारने जात होते. दरम्यान श्रीगोंदा-काष्टी महामार्गावरील हॉटेल अनन्या समोर त्यांच्या कारने उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली.
ऊसाच्या ट्रॉलीला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात या तिघांचाही दुदैवी मृत्यू झाला. या अपघातात कारचाही चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी व रस्त्याने जाणार्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
अहमदनगर ते दौंड महामार्गावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून आतापर्यंत शेकडो जणांचा जीव गेला आहे. या दुदैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.