समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तथाकथित कार्यसम्राटांनी जैन-माळी वाद लावू नये : अनंतराव गारदे, मनोज गुंदेचा ;
किरण काळे सुपारीबहाद्दर नसून शहराचे लोकप्रतिनिधी हे ताबेबहाद्दर आहेत,
“तुम्हाला” शहराच्या विकासासाठी निवडून देण्यात आले आहे, जाती-धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी नाही, काँग्रेसचा टोला
प्रतिनिधी : तुम्हाला शहराच्या विकासासाठी निवडून दिले आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी नाही. किरण काळे हे सुपारी बहाद्दर नसून तथाकथित कार्यसम्राट लोकप्रतिनिधी हे कुप्रसिद्ध ताबे बहाद्दर आहेत. हे नगरकरांना माहित आहे. माळी समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कार्यसम्राटांनी जैन-माळी वाद लावू नये. जैन आणि माळी या दोन्ही समाजांमध्ये कोणताही वाद नसून विनाकारण आपल्या राजकीय स्वार्थासाठी कार्यसम्राटांनी हा वाद पेटवू नये, असा इशारा ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बोरा व औसरकर यांचा गाळ्याचा वाद हा न्यायप्रविष्ट असून या वादाशी काँग्रेस अथवा किरण काळे आणि पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. औसरकर कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याची आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आजतागायत कधीही भेट देखील झालेली नाही. केवळ एका व्यापारी कुटुंब असणाऱ्या बोरा परिवारावर आणि सीए ऋषभ बोरा यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निंदनीय प्रकारा बाबत काँग्रेसने आवाज उठविला आहे. संरक्षण देण्याचे काम केले. कार्यसम्राटांचा यामध्ये पडद्याआडून असणारा आर्थिक स्वार्थ दुखावल्यामुळे ते पूर्णपणे बिथरले असून त्यांनी आता समाजाच्या खांद्यावर आपल्या बंदुका ठेवून जैन-माळी वाद शहरात लावण्याचे पाप केले आहे. यामुळे विनाकारण बोरा कुटुंबीय व औसरकर कुटुंबीयांची आपल्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी कार्यसम्राट यांच्यामुळे बदनामी होत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे गेलेल्या शिष्टमंडळातील बहुतांशी कार्यकर्ते हे तर राष्ट्रवादीच्या आमदारांचे समर्थक आहेत. यामुळे पडद्या आडून असणारा “त्यांचा” खरा विकृत चेहरा समोर आला आहे. शहरात कुठे अन्याय झाला तर काँग्रेस आणि किरण काळे अन्यायग्रस्तांच्या पाठीशी निर्भीडपणे उभे राहत असल्यामुळे आणि आमदारांना काळे यांच्यापासून राजकीय स्पर्धेतून असुरक्षितता वाटत असल्यामुळे त्यांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याचे गारदे, गुंदेचा यांनी म्हटले आहे.
शहरातील तरुणाईची घोर फसवणूक करणार्या आमदारांच्या तथाकथित आयटी पार्कचा भांडाफोड काँग्रेसने केला. तेव्हा देखील त्यांनी पोलिसांवर दबाव आणून किरण काळे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. माता-भगिनींना पुढे केले गेले. आता देखील माता-भगिनींना पुढे करत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचे काम कार्यसम्राट यांनी केले आहे.
आयटी पार्क प्रकरणात खोटा विनयभंग गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी पाच महिने उलटले तरी देखील आमदारांच्या दबावामुळेच त्याचा तपास अद्याप पूर्ण केलेला नाही. हा तपास ताबडतोब पूर्ण करण्यात यावा. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कोणाच्याही राजकीय दबावातून काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याची शहानिशा करत काळजी घ्यावी. अन्यथा काँग्रेसच्यावतीने सबंध जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल. अशा भ्याड षड्यंत्रांना काँग्रेस कदापि भीक घालत नाही.
सबंध राज्याला माहिती आहे की मंत्री ना. बाळासाहेब थोरात हे एक सुसंस्कृत व संयमी नेते आहेत. विनाकारण या प्रकरणाशी त्यांचे नाव जोडून आकाशावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये. पडद्याआडच्या विकृत लोकप्रतिनिधीचे थोरात यांचे नाव घेण्याची पात्रता देखील नाही. काँग्रेस कार्यकर्ते याचा योग्य वेळी खरपूस समाचार घेतील, असा इशारा देखील कार्यसम्राटांना काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.