बहिरवाडी येथील दफनभूमीचा वाद चिघळला
पोलिसांना अरेरावी ; तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; गावात तणावपूर्ण शांतता
नगर तालुका- नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे शनिवार दि. १२ रोजी दफनभूमीचा वाद चांगलाच चिघळला होता. यावेळी पोलिसांना अरेरावी करण्यात आल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी येथील आशाबाई फ्रॅन्सिस पाटोळे (वय ७०) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रवीण जगन्नाथ दारकुंडे यांच्या कुटुंबीयांकडून विरोध करण्यात आला. एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी आल्यानंतर देखील दोन्ही गट ऐकण्यास तयार नव्हते.
दारकुंडे कुटुंबियांच्या वतीने सदर जागा ही आमच्या खाजगी मालकीची असून त्यामध्ये अंत्यसंस्कार करू देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली. तर पाटोळे कुटुंबीयांकडून आम्ही पिढ्यानपिढ्या याच जागेचा दफनभूमी म्हणून वापर करत आहोत त्यामुळे येथेच अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगण्यात आले. या चाललेल्या गोंधळात सुमारे पाच तास आशाबाई पाटोळे यांच्यावरील अंत्यसंस्कार खोळंबले होते.
दरम्यान पोलिसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांशी हुज्जत घालून अरेरावी तसेच शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. यानंतर प्रवीण दारकुंडे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रकरण चांगलेच चिघळले. जगन्नाथ दारकुंडे, प्रवीण दारकुंडे, अमोल दारकुंडे, अमर दारकुंडे व त्यांच्या कुटुंबातील महिला अंत्यसंस्कार करू देण्यास विरोध करत होते. सदरच्या जागेवर दफन भूमी नसल्याचा व ती जागा आमच्या खाजगी मालकीची असल्याने येथे अंत्यविधी करू देणार नाही. अशी भूमिका दारकुंडे कुटुंबीयांनी घेतली तर पाटोळे कुटुंबीयांनीही अंत्यसंस्कार येथेच करणार असल्याची भूमिका घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली. त्यानंतर मोठा पोलिस फौजफाटा बहिरवाडी येथे दाखल झाला. पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे व सहा. पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाची समजूत काढली. त्यानंतर मयत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे गावात तणावग्रस्त वातावरण बनले असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शांतता सभेत वादंग
अंत्यसंस्कारानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने गावांमध्ये शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहा. पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी ग्रामस्थांना सदरचा वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आपण शिष्टमंडळ घेऊन या महसूल अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जागेचा वाद मिटविण्याचे आठरे यांनी सांगितले. शांतता सभा सुरू असतानाच माजी सरपंच विलास काळे व प्रवीण दारकुंडे यांची शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यांच्यामध्ये वाद सुरू असताना पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
____________________