नगर : पर्यावरण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून शहरात ७ ठिकाणच्या खुल्या मैदानात उद्याने विकसित करण्यासाठी व सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ६ कोटींच्या निधीस ‘माझी वसुंधरा अभियाना’तील बक्षिसाच्या रकमेतून राज्य सरकारने मान्यता दिल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्यावर्षी महापालिकेला माझी वसुंधरा अभियानात बक्षीस मिळाले होते. मनपाने पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी केलेल्या कामाची दखल पर्यावरण व माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने घेतली. मनपाला मिळालेल्या ६ कोटींच्या निधीतून नवी उद्याने विकसित करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. सावेडी, केडगाव, बोल्हेगाव, मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगाव रस्ता या भागातील मनपाच्या खुल्या मैदानांवर उद्याने विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यासाठी आमदार जगताप यांचा राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू होता.
पर्यावरण विभागाने आज, मंगळवारी आदेश काढून शहरातील ७ उद्यानांसाठी प्रशासकीय मान्यता देत ६ कोटींचा निधी मंजूर केला. शहरात सध्या २५० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. त्यातून शहरातील रखडलेली कामेही मार्गी लागतील. नव्या ७ उद्यानांमुळे शहर विकासात वैभवात भर पडेल, असे आमदार जगताप यांनी सांगितले.