बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतानाही काल झालेल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या निवडीनंतर जल्लोश करणं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जमाव बंदी असतानाही गर्दी जमवली म्हणून राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांचे चिरंजीव नगरसेवक आदित्य पाटील यांच्यावर ही गुन्हा दाखल झाला आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन करत जमाव गोळा करणं केज शहरातील नगरपंचायतच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांना चांगलंच अंगलट आलं आहे. नगरपंचायतीच्या निवडी झाल्या आणि पदभार घेण्यापूर्वीच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भाजप पुरस्कृत स्थानिक आघाडी केजमध्ये सत्तेत आली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या मदतीने याठिकाणी स्थानिक आघाडीचा नगराध्यक्ष बनला आहे आणि याच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. अगदी फटाके फोडून पेढे वाटून आणि गुलाल उधळून या ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकांनी ओपन जीपमधून मिरवणूक सुद्धा काढली होती. यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणी ओपन जीपमधून जल्लोष करणारे रजनी पाटील यांचे चिरंजीव आणि केज नगरपंचायतचे नगरसेवक आदित्य पाटील यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला आहे.