केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दोन्ही पक्षांनी भाजपवर दबाव तयार करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात हा दावा केला आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी लोकसभेचे अध्यक्षपदावर दावा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता, भाजप नेतृत्त्व काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागले आहे.भविष्यात संभाव्य पक्ष फुटीपासून आघाडीतील मित्र पक्षांना वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षांतरविरोधी कायद्यात सभापतींची भूमिका महत्त्वाची असते. सूत्रांनी सांगितले की, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनीही अध्यक्षपदासाठी भाजपच्या इतर काही मित्रपक्षांशी चर्चा केली आहे. मात्र, बुधवारी नवी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नायडू आणि नितीशकुमार अधिकृतपणे ही मागणी मांडतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही. या बैठकीला दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.