महिला व बालकल्याण मंत्री ना.ठाकुर नगरला येणार – काळेंची माहिती
मुंबई : शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध व्यावसायिक व रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी महिलांना रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने नगर शहरासाठी काँग्रेस पक्षाच्या पुढाकारातून विशेष प्रकल्प राबविण्याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्यासमवेत किरण काळे यांनी चर्चा केली आहे.
मुंबईत झालेल्या या बैठकीच्या वेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, एनएसयुआय प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री ना. ठाकूर व काळे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास या विषयाबाबत सखोल चर्चा झाली आहे.
शहरातील महिलांशी संवाद साधण्यासाठी मी लवकरच नगरला येईल. किरण काळे हे काँग्रेसच्या माध्यमातून नगर शहरातील महिलांसाठी सक्षमीकरणाचे व त्यांना आधार देण्याचे काम सक्षमपणे करीत आहेत. नगर शहरातील महिलांच्या रोजगारासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी माझे सहकार्य राहिल असे ना. यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना किरण काळे म्हणाले की, शहरातील महिलांचे सक्षमीकरण खऱ्या अर्थाने करायचे असेल तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावरती उभे करणे महत्त्वाचे आहे. पूर्वी घरातील कमावत्या पुरुषाच्या खांद्यावर प्रपंचाचा भार असायचा. मात्र कोरोनामुळे अनेकांचे संसार मोडकळीस निघाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीला लोकांना सामोरे जावे लागले आहे.
त्यामुळे कोरोनाच्या काळात अनेक महिलांनी देखील आपल्या प्रपंचाला हातभार लावण्याच्या दृष्टीने पुढे येत कुटुंबाची आर्थिक घडी सुव्यवस्थित करण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यामुळे शहरातील महिलांसाठी आर्थिक सक्षमता देणाऱ्या रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्याची गरज आहे. ज्या महिलांना स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय करायचा आहे अशा महिलांना देखील त्यासाठी सहाय्य करण्याची गरज असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
त्यादृष्टीने राज्य सरकारच्या सहाय्याने महिलांसाठी विशेष प्रकल्प राबविण्याबाबत मंत्री ना.यशोमती ठाकूर यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाल्याचे किरण काळे यांनी सांगितले आहे. महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ना.ठाकूर यांच्या माध्यमातून नगर शहरातील महिलांसाठी रोजगाराचा विशेष प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.
विधवा महिला, परित्यक्त्या, निराधार महिला, वयोवृद्ध महिला यांच्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे काम केले जाईल. यासाठी आणि महिला बालकल्याण विभागाशी निगडित महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसशी संपर्क साधण्याचे आवाहन काळे यांनी आहे.
फोटो ओळी : नगर शहरातील महिलांसाठी विशेष प्रकल्प राबविण्याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री नामदार यशोमती ठाकूर यांचे मुंबई येथे भेट घेत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सुमारे अर्धातास सकारात्मक चर्चा केली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, एनएसयुआय प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी उपस्थित होते.