राज्यातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आदी नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत असतानाच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सरकार धोका आणि कट रचून बनवलं गेले. पंतप्रधान अशा राजकारणाचे समर्थन करतात. पंतप्रधान रॅलींमधूनही समाजाला तोडण्याच्या गोष्टी करतात. पंतप्रधान मोदींचे फोडाफोडीचे राजकारण कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, सर्वत्र सुरू आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी जवळपास ४६ जागा मिळतील, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
“मोदी सरकार धमकी आणि आमिष दाखवून विरोधी पक्षाला फोडत आहे. मूळ पक्षाचे चिन्ह हिरावून घेतलं जात आहे आणि बंडखोरांना दिलं जात आहे. हे सगळं मोदींच्या इशाऱ्यावर होतेय. पण यंदा निवडणुकीत हे होणार नाही. यंदाची निवडणूक जनता लढते आहे. लोक यांच्यावर नाराज आहेत,” असेही मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.