राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगाव तालुक्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी त्यांनी मतदारांना आवाहन करताना जणू दिलीप वळसे पाटील यांना पाडण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले.शरद पवार म्हणाले, जर हे लोक आम्हा लोकांबरोबर निष्ठा ठेवत नसतील तर उद्या निवडून दिल्यानंतर जनतेशीही निष्ठा ठेवणार नाहीत, एवढंच मला सांगायचे आहे. हे चित्र बदलायचे असेल तर तुम्हा सर्वांना जागं राहावं लागेल. पुढील दोन महिने आम्ही पिंजून काढू. निष्ठावंतांना निवडून आणू, तुम्हीही निष्ठवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो, असेही आवाहन शरद पवार यांनी केले.
इथून मागच्या सगळ्या निवडणुका आठवा. या जिल्ह्यातले उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक लढले, त्याच्यावर फोटो कुणाचा वापरला. मात्र सर्व सुरळीत सुरू असताना कुणाची धमकी आली आणि त्यांनी पक्ष सोडून दुसरीकडे प्रवेश केला. त्यामुळे यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला जागे व्हावे लागणार आहे. अनेक लोकांनी माझ्यासोबत काम केले आहे. येत्या निवडणुकीत निष्ठा न पाळणाऱ्यांना धडा शिकवावा लागणार आहे, असे शरद पवार म्हणाले.राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे सर्वात एकनिष्ठ मानले जायचे. शरद पवारांनी त्यांना मानस पुत्र मानले होते. मात्र ते आपली साथ सोडतील असे शरद पवारांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यांच्या जाण्याचा शरद पवारांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र आज सभा घेतल्याने शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांना पाडण्याचा चंगच बांधल्याचे पाहायला मिळाले.