नगर – नागरदेवळे ( ता. नगर ) गावाला नगरपरिषद करण्याला राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली. ही मान्यता म्हणजे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना दिलेला मोठा धक्का समजला जातो. नागरदेवळे ग्रामपंचायतीत ग्रामसचिवालयासमोर, नगरपरिषद की ग्रामपंचायत, याबाबत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. मतदान घेऊन लोकांचा कलही जाणून घेण्यात आला.
यात ग्रामपंचायतीच्या बाजूने 578 ग्रामस्थांनी, तर नगरपरिषदेच्या बाजूने 484 ग्रामस्थांनी मतदान केले. नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभेला मोठी गर्दी झाली होती.
नगर तालुक्यातील नागरदेवळ्यासह शेजारच्या वडारवाडी, शहापूर, केतकीसह नगरपरिषद करण्याचा प्रस्ताव मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारकडे पाठविला होता. यावरून शिवाजी कर्डिले व तनपुरे यांच्यात गेल्या चार महिन्यांपासून वाक्युद्ध सुरू आहे. मंगळवारी नागरदेवळे ग्रामपंचायतीने सरपंच सविता पानमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलाविली होती. दोन तासांच्या चर्चेनंतर, नगरपरिषद व्हावी की ग्रामपंचायत, यासाठी मतदान घेतले गेले. यात 450 महिला व 612 पुरुषांनी अशा एकूण 1 हजार 62 ग्रामस्थांनी मतदान केले. नगरपरिषदेच्या बाजूने 484 तर ग्रामपंचायतीच्या बाजूने 578 जणांनी मतदान केले. याचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.