बारामती येथे लोकार्पण
नगर : प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या खासदार नीलेश लंके यांना आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी खा. शरद पवार यांनी एक कोटी रूपये खर्चून तयार करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्याची भेट दिली आहे. या फिरत्या दवाखान्यामध्ये विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. शनिवारी खा. शरद पवार यांनी शरदचंद्र पवार आरोग्य रथाचे बारामती येथे लोकार्पण केले.
देशामध्ये कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून हजारो कोरोना रूग्णांना मदतीचा हात दिला. त्यांचे हे काम पाहून त्यावेळीही शरद पवार यांनी नीलेश लंके यांना एक अद्यावत रूग्णवाहिका भेट दिली होती. खा. लंके यांनी कोरोना काळात केलेले काम जगभरात गाजले. कोरोना संकटानंतरही खा. लंकेे यांचे आरोग्याच्या बाबतीत काम सुरूच असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही त्यांनी हजारो रूग्णांना मदत मिळवून दिलेली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातूनही खा. लंके यांनी रूग्णांना मदत मिळवून देण्यास सुरूवात केली आहे.
विशेषतः पारनेर नगर मतदारसंघात मोठया प्रमाणावर आदिवासी भाग असून या आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. एखाद्या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत तर रूग्ण दगावण्याचीही भिती असते. त्यामुळे एका फिरत्या दवाखान्याची उपलब्धता असावी अशी खा. लंके यांची मागणी होती. खा. लंके यांची ही मागणी शरद पवार यांनी उचलून धरीत नीलेश लंके प्रतिष्ठाणसाठी अद्यावत फिरता दवाखाना भेट दिला.
यावेळी आ.अशोक पवार,सक्षणा सलगर, सुदाम पवार, विक्रम राठोड ,बापूसाहेब शिर्के,अर्जुन भालेकर, प्रा. संजय लाकुडझोडे, डॉ. बाळासाहेब कावरे यांच्यासह खा. नीलेश लंके यांचे अनेक सहकारी उपस्थित होते.