घरकुल बांधकामासाठी लाभार्थीला वाळूची आवश्यकता होती. यामुळे नदीतून वाळू वाहतूक करू देण्यासाठी लाभार्थ्यांकडून लाच स्वीकारताना तलाठीला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोर तलाठीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी रवींद्र काशिनाथ पाटील (वय ५०) असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या लाचखोर तलाठ्याने नाव आहे. पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. विटनेर येथील एकास पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल मंजूर झाले होते. घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू लागत होती. ट्रॅक्टरने वाळू वाहतुकीसाठी तलाठी रवींद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली. त्यानुसार तलाठी रवींद्र पाटील यांनी २८ मे रोजी वाळू वाहतुकीच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची रोकड स्वीकारत असताना पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे आणि पथकाने त्यांना मुद्देमालासह पकडले. त्यांच्यावर चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.