दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षा शुल्कात ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १७ नंबरचा परीक्षा अर्ज आणि नावनोंदणी शुल्कही महाग झाला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. तर मग आता दहावीच्या विद्यार्थ्यांना किती शुल्क भरावा लागणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
१७ नंबरचा अर्ज भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार असल्याचं समोर येत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १७ नंबरच्या अर्जात ३० रुपयांनी वाढ केली आहे. तर नावनोंदणी शुल्कात ११० रुपयांनी वाढ केल्याची माहिती मिळत आहे. याचा भार नक्कीच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या खिशावर पडणार आहे.
नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ४२० रुपयांवरून ४७० रुपये करण्यात आलं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे दर जाहीर केले आहेत. आता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा भार सहन करावा लागणार आहे. याबाबत अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.