अहमदनगर -परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 11 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संस्थेचा चेअरमन नितीन सुभाष घुगे (वय 33 रा. टेलीफोन ऑफीससमोर, शेवगाव, हल्ली रा. एन.आर.आय.कॉम्पलेक्स, नवी मुंबई) याला नवी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला काल, रविवारी श्रीरामपूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
परळी पीपल्सच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये ठेवीदारांनी सुमारे 11 कोटींच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. मात्र, त्या पैशांचा योग्य विनियोग न झाल्याने सोसायटी डबघाईला आली. परिणामी, ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नाहीत. श्रीरामपूर शाखेत ठेवलेल्या ठेवी परत न मिळाल्यामुळे ठेवीदाराने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. यापूर्वी विश्वजित राजेसाहेब ठोंबरे, प्रमोद खेेडकर, अमित गोडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलेश मानुरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मध्यंतरी या गुन्ह्याचा तपास थंडावला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेला संस्थापक चेअरमन नितीन घुगे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता.
त्याला अटक केली जात नव्हती. तो नवी मुंबईत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने शनिवारी (27 सप्टेंबर) घुगे याला नवी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.