अहमदनगर-संगमनेर शहरातील अकोले बायपासलगत असणाऱ्या एका कॅफे हाऊसवर शहर पोलिसांनी काल गुरूवारी (दि. २८) छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कॅफे हाऊसमधून १२ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व कॅफे चालकास ताब्यात घेतले. यामध्ये सहा मुली आणि सहा मुलांचा समावेश आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की संगमनेर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे कॅफे हाऊस सुरू आहेत. या कॅफे हाऊसमध्ये अनैतिक प्रकार सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वी एका कॅफे हाऊसवर कारवाई करण्यात आली होती. शहरातील अकोले बायपासलगत असणाऱ्या कॅफे हाऊसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांनी मिळताच त्यांनी या कॅफे हाऊसवर छापा टाकला.
या ठिकाणी पोलीस पथकाला सहा मुले, सहा मुली आढळून आल्या. सदर कॅफेमध्ये कोणतेही साहित्य व कॅफेचा बोर्ड पोलीस पथकाला आढळून आला नाही. तरुण-तरुणींना एकांत मिळावा या उद्देशाने स्वतंत्र कप्पे बनवून देण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कॅफ हाऊसमध्ये आढळलेल्या मुला-मुलींसह कॅफेचालकाला ताब्यात घेतले. संबंधितावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही दिवसांपूर्वी शहरातील विविध कॅफेंवर एकाचवेळी छापा टाकून २०हून अधिक मुला-मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच कॅफेमध्ये काही मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी काही दिवसांपूर्वी या बेकायदा कॅफे चालकांविरोधात धडक कारवाई केली होती. या कारवाईनंतर काल गुरूवारी पुन्हा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कॅफे हाऊसवर कारवाई केली आहे.दरम्यान अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून कॅफे हाऊस चालक अभय चंद्रकांत गवळी याच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.