गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानं मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण आता तुडुंब भरले आहे. बुधवारी संध्याकाळी जायकवाडी धरणाचे महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यानंतर गोदापात्रात 9432 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. जायकवाडी धरण 99.78 % ने भरले आहे. जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने 9 सप्टेंबरला एकूण सहा गेट अर्धा फुटाणे उघडले होते. त्याच दिवशी सायंकाळी विसर्गात वाढ करण्यात आली होती व एकूण 12 दरवाजांमधून विसर्ग सुरू होता. 10 सप्टेंबरला पुन्हा सहा गेट उघडण्यात आले व एकूण 18 गेटमधून 9432 क्युसेक विसर्ग गोदापत्रात सुरू होता.
आता अवघ्या पंधरा दिवसांनी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 13 सप्टेंबरला बंद केलेले हे दरवाजे बुधवारी पहाटे उघडण्यात आले असून या दरवाजातून 94321 गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.
जायकवाडी प्रशासनाने बुधवारी पाच वाजता 2096 क्यूसेकने विसर्गात वाढ केली होती. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला असून एकूण 11528 क्युसेकने विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरसह हजारो गावांची तहान जायकवाडीच्या पाण्याने भागते. याशिवाय औष्णिक वीज प्रकल्पाला तसेच शेती सिंचन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. बुधवारी आधी सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सहा दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर विसर्ग वाढवण्यात आला. यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.