अहमदनगर – नगर जिल्ह्यातील २ अल्पवयीन मुलींना कशाचे तरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याच्या घटना राहाता तालुक्यातील लोणी आणि नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे गुरुवारी (दि.४) सायंकाळी ते शुक्रवारी (दि.५) दुपारी १ या कालावधीत घडल्या आहेत. याबाबत लोणी आणि नगर तालुका पोलिस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
राहाता तालुक्यातील लोणी गावातील सोनगाव रोडवरील आदिवासी निवारा येथून एका १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (दि.४) सायंकाळी ७ च्या सुमारास फुस लावून पळवून नेले आहे. सदर मुलीचा तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने तिच्या आईने शुक्रवारी (दि.५) पहाटे लोणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भा.दं.वि.३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अपहरणाची दुसरी घटना नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे शुक्रवारी (दि.५) सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत घडली. तेथील १७ वर्ष वयाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून घरातून पळवून नेले आहे. तिचा दिवसभर शोध घेवूनही ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भा.दं.वि.३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत आहेत.