नगर – नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढतच असून अशाच आणखी दोन घटना नगर शहरात घडल्या आहेत. तारकपूर परिसरातून एका १७ वर्षीय तर निंबळक बायपास चौकाजवळील कोतकर वस्ती येथून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी २ अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचे २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत बोल्हेगाव फाटा येथील अल्पवयीन मुलगी आई सोबत दि.७ डिसेंबर रोजी तारकपूर परिसरातील एका रुग्णालयात आली होती. दुपारी १२.३० च्या सुमारास ती पाण्याची बाटली घेवून येते असे सांगून बाहेर गेली ती पुन्हा बराच वेळ परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईने आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला पण ती मिळून आली नाही. त्यानंतर दोन दिवस तिचा शोध घेवूनही ती सापडली नाही.
त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतुन पळवून नेले असल्याची फिर्याद सदर महिलेने सोमवारी (दि.९) तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत निंबळक बायपास चौकाजवळील कोतकर वस्ती येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि.९) सकाळी ८ च्या सुमारास घरासमोरून बेपत्ता झाली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला असता काहीही माहिती भेटली नसुन ती कोठेही मिळुन आली नाही.
त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतुन पळवून नेले असल्याची फिर्याद सदर मुलीच्या वडिलांनी सोमवारी (दि.९) सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.