अहमदनगर-शनिवारी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून जिल्हाभर ऑनलाईन सुरू झालेली प्राथमिक शिक्षकांची बदलीची प्रक्रिया रात्री 11. 30 वाजता संपली. या 13 तासांच्या कालावधीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करत बदलीसाठी पात्र 2 हजार 605 शिक्षकांची समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण केली. या बदलीत दिवसभरात 234 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून यात संवर्ग एकमध्ये 107, पती-पत्नी एकत्रिकरणात 43, अवघड क्षेत्रातून 14, ज्येष्ठता क्रमाने 70 यांचा समावेश आहे.
यंदा राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पध्दतीने आणि वेळेत शिक्षकांच्या बदल्या झाल्या. राज्य सरकारच्यावतीने याबाबत स्पष्ट आदेश नव्हते. नगर जिल्ह्यात प्रशासनाने आधी बदल्या कराव्यात की नाहीत, याबाबत भूमिका घेतली नव्हती. मात्र, शिक्षक संघटनाच्या मागणीची दखल घेत अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बदल्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यंदा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शिक्षकांना बोलावण्यापेक्षा त्यांना पंचायत समिती पातळीवर ऑनलाईन हजर राहण्यास सांगितले. तर मुख्यालयात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, कक्ष अधिकारी संभाजी भदगले यांनी बदल्यांची प्रक्रियेत सहभागी झाले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर स्वत: पूर्णवेळ सहभागी होत बदल्यांवर लक्ष ठेवून होते. यंदा जिल्ह्यात बदलीसाठी 3 हजार 800 शिक्षकांनी अर्ज केले होते. ही संख्या वाढत 4 हजार 17 झाली होती. मात्र, यातील बदलीपात्र असणार्यांची संख्या शेवटी 2 हजार 605 पर्यंत खाली आली. या सर्वांची बदलीच्या प्रक्रियेत समुदेशनात सहभागी करून घेत जिल्हा परिषद प्रशासनाने 13 तासाच्या दिव्यानंतर बदल्याची प्रक्रिया पूर्ण केली. शनिवारी झालेल्या बदल्यामध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम संवर्ग 1- 59, पती-पत्नी एकत्रिकरण 30, अवघड क्षेत्रातून 6, ज्येष्ठता क्रमाने 34 अशा 129 बदल्या झाल्या.
पद्वीधर शिक्षक मराठी माध्यमातून 24 संवर्ग 1, पती-पत्नी एकत्रिकण 13, अवघड क्षेत्र 8 अशा 78, मुख्याध्यापक पदासाठी संवर्ग 1 मधून 20, प्राथमिक शिक्षक उर्दू संवर्ग एक 3 आणि सेवाज्येष्ठेने 3 अशा 6 बदल्या. पद्वीधर उर्दू माध्यम संवर्ग एक 1 अशा 234 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यंदाच्या बदली प्रक्रियेत उपशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे, विस्तार अधिकारी विलास साठे, संजय छाईलकर, योगेश गवांदे, योगेश पंधारे, सुनील पवार, विजय तमनर, ज्ञानेश्वर फसले, प्रशांत सदावर्ते, महेश सुरोडे, विजय चोभे, प्रतिक्षा ससाणे, भालसिंग हे कर्मचारी सहभागी झाले. यंदाची बदलीची प्रक्रिया एकाच वेळी आणि पारदर्शक पारपडली. यासाठी सर्व प्रशासनातील अधिकार्यांना धन्यवाद अशी प्रतिक्रिया बदलीचा लाभ मिळालेल्या शिक्षिका कविता रोहकले यांनी दिली.
यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अशक्य वाटत होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिक्षकांना दिलेला शब्द पाळत गेल्या 10 दिवसांत प्रयत्नांची पराकाष्टा करत पहिल्यांदा विक्रमी वेळेत पारदर्शक आणि गतीमान पध्दतीने शिक्षकांना न्याय दिला. 5 सप्टेंबरच्या शासननिर्णयामुळे दोन शिक्षक असणार्या शाळांची माहिती खुली करता आली नाही. याचे खापर जिल्हा पातळीवर शिक्षण विभागावर फोडणे चुकीचे आहे.
– शरद वांढेकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
यंदा जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाने कमी वेळेत बदल्यांची प्रक्रिया राबवली. यामुळे बदली पात्र शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची सोय झाली. बदली प्रक्रियेतील शेवटच्या शिक्षकासाठी रात्री उशीरापर्यंत जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील होते. दरवर्षी अशाच पध्दतीने शिक्षकांना न्याय मिळावा. मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांचे आभार.
– आर. आर. गायकवाड, मुख्याध्यापक, चासनळी