नाले बांधकामाचे बिल मंजूर करुन देण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजारांची लाच घेणारा मालेगाव महानगरपालिकेचा सहायक आयुक्त सचिन महाले याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून गजाआड केले आहे. दरम्यान, या सहायक आयुक्ताच्या घराची झडती घेतली असता एसीबी पथकाच्या हाती मोठे घबाड लागले असून यात साडेनऊ लाख रुपयांचे सोने व १३ लाख रुपयांच्या रोकडचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन सुरेंद्र महाले (वय ५१, रा. वर्धमाननगर, एलआयसी ऑफिस, मालेगाव कँम्प) असे लाचखोर संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. तो मालेगाव महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक असून सध्या त्याच्याकडे कर विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यातच त्याने महापालिका आयुक्तांचा स्वीय सहायक(पीए) असल्याने तुमचे बिल तत्काळ मंजूर करुन देतो असे सांगत बांधकाम ठेकेदाराकडून एकूण बिलाच्या चार टक्के रक्कम व बक्षिस मागितल्याचे समोर आले आहे.
प्रकरणातील ३४ वर्षीय तक्रारदार हा बांधकाम ठेकेदार असून त्याने मालेगाव महानगरपालिके अंतर्गत गटार बांधकामाचे टेंडर भावाच्या नावे घेतले होते. काम पूर्ण करून नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरीता त्याने संशयित महाले याची भेट घेतली असता महाले याने ‘महापालिका आयुक्त’ यांचा स्वीय सहायक असल्याचा प्रभाव तक्रारदारावर टाकून बिल लवकर मंजूर करून देतो असे सांगितले. मात्र, बिल मंजूर झाल्यावर स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून बिलातील चार टक्के रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले होते.
त्यानुसार बिल मंजूर झाल्यावर तक्रारदार हा महाले याला भेटावयास गेला असता, त्याने(दि.१३) रोजी पंचासमक्ष यांच्यावर ३३ हजार रुपयांची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर(दि.२१) सायंकाळी महाले याने लाचेची रक्कम स्विकारताच सापळा रचून असलेल्या एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. याबाबत किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने महाले यास पोलीस कोठडी सुनावली आहे. एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधिक्षक माधव रेड्डी, पाेलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, ज्योती शार्दुल, परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली.