नगरच्या नेप्ती उपबाजारातील कांदा व्यापाऱ्याकडून मध्यप्रदेशातील इंदोर येथील व्यापाऱ्याने कांदा खरेदी करत त्या पोटीची ३६ लाख ३५ हजार १२२ रुपये रक्कम देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इंदोरच्या व्यापाऱ्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कांदा व्यापारी राहुल रामदास आंधळे यांनी फिर्याद दिली आहे. आंधळे हे नेप्ती उपबाजार येथील जयश्री ट्रेडिंग कंपनी या फर्म मध्ये भागीदार आहेत. या फर्म मार्फत ते शेतकऱ्यांनी कांदा मार्केट मध्ये विक्रीस आणलेला कांदा खरेदी करून तो परराज्यातील मोठ्या व्यापारयांना विक्री करतात. मध्यप्रदेशातील इंदोर येथील व्यापारी शाबीर शब्बीर खान याने गेल्या काही दिवसांपासून आंधळे यांच्याशी व्यवहार करत त्यांच्या कडून खरेदी केलेल्या कांद्याचे वेळेवर पैसे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२४ ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्याने आंधळे यांच्याकडून सुमारे ३६ लाख ३५ हजार १२२ रुपये किमतीचा कांदा खरेदी केला. या पूर्वीचे व्यवहार चांगले असल्याने आंधळे यांनीही त्याच्यावर विश्वास दाखवून कांदा पाठवला. मात्र त्यानंतर शाबीर खान याने हे पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. अनेकदा संपर्क करूनही त्याने पैसे न पाठविल्याने आंधळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी (दि.३) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी शाबीर खान याच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करीत आहेत.