अहमदनगर-जातीय तणाव, दंगलीत सहभाग, मारामारीसारखे गुन्हे दाखल आहेत. अशा नगर शहर आणि परिसरातील 475 आरोपींवर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार नगर विभागाचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी ही कारवाई प्रस्तावित केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. सामाजिक शांतता बिघडविणार्या गुन्ह्यांमधील आरोपींचा यामध्ये समावेश आहे.
जातीय तणाव निर्माण करणार्या गुन्ह्यातील आरोपी, दंगली, मारामारी, खुनी हल्ले करणारे अशा आरोपींचा समावेश आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस दोन दिवस त्यांना शहर आणि परिसरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये येण्यास बंदी राहणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील कलम 163 (2) नुसार सामाजिक सुरक्षेला बाधा निर्माण करणार्यांना ठराविक कालावधीसाठी तडीपार करण्याचा प्रांताधिकार्यांना अधिकार आहे.
कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, नगर तालुका आणि एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 120 आरोपींवर कारवाई प्रस्तावित आहे. त्यांना ता. 15 ते 17 दरम्यान शहर हद्दीबाहेर रहावे लागणार आहे. तोफखाना हद्दीतील 148 तर कोतवाली हद्दीतील 160 आरोपींना ता. 16 रोजी रात्री 12 ते ता. 17 रोजी रात्रीच्या 12 पर्यंत तडीपार केले जाणार आहे. नगर तालुका आणि एमआयडीसी हद्दीतील इतर दीडशे आरोपींचा समावेश आहे.