अहमदनगर-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची शांतता व जनसंवाद रॅली आज (सोमवार) नगर शहरात येत आहे. सकाळी 11 वाजता केडगाव येथे रॅलीचे स्वागत होईल. तेथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली सुरू होणार आहे. शहरात साडेसहा किमी पदयात्रेने चौपाटी कारंजा येथे सांगता सभा होणार आहे. दरम्यान, बंदोबस्तासाठी 43 पोलीस अधिकारी व 450 अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. रॅलीसाठी जिल्हाभरातून मराठा समाज बांधव शहरात येणार आहेत. शहराला जोडल्या जाणार्या महामार्गावर व रॅलीकडे जाणार्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पोलीस प्रशासनाने रॅली मार्गावर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर केला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. महामार्गावरील मोकळ्या जागा, मैदाने अशा ठिकाणी वाहन पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करणार्या अजय महाराज बारस्कर यांच्या समर्थनार्थ प्रेमदान चौकात मोठा फलक लावण्यात आला होता. पोलिसांना माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तत्काळ हा फलक हटवला. जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षता म्हणून हा फलक काढल्याचे सांगण्यात आले.
शांतता रॅलीसाठी 1 अपर पोलीस अधीक्षक, 3 उपअधीक्षक, 11 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक व उपनिरीक्षक, 450 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेर्यांव्दारे रॅली मार्ग व परिसरात वॉच ठेवण्यात येणार आहे.