अहमदनगर -गेल्या 24 तासात नगर शहर, एमआयडीसी भागात 4 व नगर तालुक्यात 3 अशा एकूण 7 जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. सहा जणांनी बुधवारी सायंकाळी ते गुरुवारी सायंकाळी या वेळेत गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एकाचा मृतदेह तलावात आढळून आला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्याची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी परिसरात कराचीवाला बेकरीजवळ एका कंपनीच्या शेडला गळफास घेऊन परप्रांतीय युवकाने आत्महत्या केली. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. एमआयडीसी परिसरातच आणखी एका परप्रांतीय युवकाने आत्महत्या केली. रामनाथ चौहान (वय 24, रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. या दोन्ही घटना बुधवारी सायंकाळी 7 ते 8 यावेळेत तासाभराच्या अंतराने घडल्या. तर आणखी एका 45 वर्षीय परप्रांतीय व्यक्तीने एमआयडीसीत गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. भैय्यालाल बलिराज सिंग (रा. बिहार) असे त्याचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. शहरातील प्रेमदान हडको परिसरात गोरख नारायण आकेन (वय 43) यांनी आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घरगुती वादातून आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत. नगर तालुक्यातील इमामपूर येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. तसेच नगर तालुक्यातच दशमीगव्हाण येथे शिवाजी हरिभाऊ काळे (वय 28) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर टाकळी खातगाव येथे तलावात एक अनोळखी मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटलेली नाही. या तीन्ही गुरुवारी सकाळी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चोवीस तासांत केवळ नगर शहर व तालुक्यात 7 आत्महत्यांची नोंद झाली आहे.