अहमदनगर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (एलसीबी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल, गुरूवारी सायंकाळी नगर शहरात दोन ठिकाणी कारवाई करून 72 लाखाची रोकड पकडली. ही रोकड हवाल्याची असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पुढील कार्यवाही सुरू होती.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून पोलीस दलाकडून अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्नीशस्त्रे यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीसह स्थानिक पोलिसांना नाकाबंदी, गस्त वाढविण्याची आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला माध्यमातून पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने पोलीस दल अलर्ट झाले आहे. हवाल्याचा धंदा सुरू असलेल्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पोलिसांना मिळाली होती. अधीक्षक ओला यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नगर शहरातील ख्रिस्तगल्ली व मार्केट यार्ड परिसरात काल सायंकाळी छापेमारी करून 72 लाखाची रोकड ताब्यात घेतली. याप्रकरणी चेतन पटेल व आशिष पटेल या दोघांना ताब्यात घेतले आहे. ते मुळचे गुजरात राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी ऐवढी मोठी रोकड नगर शहरात कशासाठी आणली होती याबाबतची चौकशी त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान नगर शहरात मोठ्या प्रमाणात हवाल्याचा धंदा सुरू असून ऐन निवडणुकीच्या काळात हवाल्याची रोकड पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर ब्रेकिंग: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात 72 लाखांची रोकड ताब्यात, दोघांची चौकशी सुरू
- Advertisement -