Wednesday, May 22, 2024

मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट शरद पवारांना ललकारले… बारामतीत यंदा भाकरी फिरणारच…

पुणे : १८ एप्रिल २०२४

बारामतीमध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आहे. बारामतीकरांनी परिवर्तन करायचा निर्धार, संकल्प केला आहे. ही लढाई ऐतिहासिक असली तरी ती वैयक्तिक नाही. विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. अब की बार सुनेत्राताई पवार, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी शरद पवार साहेबांचे बोट धरून राजकारण शिकलो. पण शरद पवार यांचे बोट सोडल्यावर मोदीजींनी देशाचा कायापालट केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा शरद पवार यांचे बोट आता सोडले आहे. सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

देशाला महासत्ता बनवण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. हे वचन पंतप्रधान पूर्ण करतीलच याची गॅरंटी आहे. आता देशामध्ये केवळ मोदी गॅरंटी चालते आणि म्हणून ही देशाची निवडणूक हे देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही. वयाचे ५४ वर्ष उलटले तरी सुद्धा परिपक्वता येत नाही. इस्रोने चांद्रयान लॉन्च केले. परंतु काँग्रेस राहुल गांधी यांना लाँच करू शकली नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला लगावला.

तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला महाविकास आघाडीकडे आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे. त्या तुलनेत आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड जनता येथे आली आहे, यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाची पोचपावती असून बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles