लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या खासदार डॉ. कल्याण काळे यांना मोठा धक्का बसला आहे. चित्तेपिंपळगाव दूध संस्था निवडणुकीत त्यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांचं अख्खं पॅनल निवडून आलं आहे. विशेष बाब म्हणजे स्वतः आमदार बागडे या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून उभे होते, ते देखील विजयी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात जुन्या असलेल्या चित्तेपिंपळगावच्या दूध संस्थेच्या निवडणुकीत आमदार हरिभाऊ बागडे यांचे सहकार विकास पॅनल उभे होते. तर खासदार काळेंच्या नेतृत्वाखाली शामबाबा गावंडे यांचे शिवशक्ती पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी ही निवडणुकीत अत्यंत अटीतटीची केली होती. त्यांनी अत्यंत ताकदीने निवडणुकीत प्रचार केला. दुसरीकडे खासदार कल्याण काळे यांनी देखील निवडणुकीत संपूर्ण ताकद लावून दिली.
मात्र, या चित्तेपिंपळगाव गोसंवर्धन दूध व्यावसायिक सहकारी संस्था निवडणुकीत अखेर आमदार हरिभाऊ बागडेंच्या पॅनलने सर्व जागा जिंकल्या. तर खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती दूध डेअरी पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
आमदार बागडे सर्वसाधारण गटातून स्वतः निवडणुकीत उभे होते, ते देखील विजयी झाले. बागडेंच्या पॅनलमध्ये सर्वाधिक २२१ मते घेतली. तर कल्याण काळे यांच्या पॅनलमधील उमेदवारास सर्वात कमी १०६ मते पडली. एकूण २८८ मतदारांनी मतदान केले होते. हा कल्याण काळे यांना मोठा धक्का मानला जात आहे.