अहमदनगर (प्रतिनिधी) – शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवार (दि.३) पासून सुरुवात झाली असून पहिल्याच माळेला बुऱ्हाणनगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या भिंगार कम्प पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या आगीत कारचे मोठे नुकसान झाले.
नवरात्रौत्सवानिमित्त गुरवारी सकाळी तुळजाभवानी देवीची महापूजा, अभिषेक करून दुपारी १२ वाजता भक्तिपूर्ण वातावरणात घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. दुपारी कायनेटिक चौक येथील जयकुमार जीवनलाल मुनोत यांच्या कुटुंबातील सदस्य मारुती कंपनीच्या इग्नीस कारने (क्र. एम.एच. १३ सी.एस. २६९९) बुऱ्हाणनगर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. सदर कार ही सीएनजी वरील होती.
कार मधील सदस्य मंदिराकडे दर्शनासाठी गेल्यावर चालकाने सदर कार मंदिरापासून काहीशा अंतरावर असलेल्या मंगल कार्यालयाच्या बाजूला उभी केली होती. दुपारी २ च्या सुमारास कारने अचानक मागील बाजूस पेट घेतला. सुरुवातीला धूर आणि नंतर आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
तेथे बंदोबस्तासाठी असलेले भिंगार कम्प पोलिस ठाण्यातील स.पो.नि. जगदीश मुलगीर, स.फौ. अजय नगरे, पो.हे.कॉ. दत्तात्रय मोरे, अजय गव्हाणे, पो.कॉ.अमोल आव्हाड आदींनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत नागरिकांना कार पासून दूर पांगविले. तसेच त्यांना भयभीत न होण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या अग्निशामक दलाला फोन करून बोलावले. अग्निशामक दलानेही तातडीने घटनास्थळी धाव घेत पेटलेल्या कार वर पाण्याचा मारा करत आग विझवली. मात्र तो पर्यंत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.