अहमदनगर (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलाचा छळ करून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बापाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण मांडगे (रा. आदर्शनगर, विद्या कॉलनी, कल्याण रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या बापाचे नाव आहे. त्याच्या छळाला कंटाळून अल्पवयीन मुलगा पार्थ संदीप मांडगे (वय 17) याने 29 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याची आई विद्या संदीप मांडगे (वय 43 रा. आदर्शनगर, विद्या कॉलनी, कल्याण रस्ता, हल्ली रा. भिमराज नानाभाऊ कांडेकर यांच्याकडे नेप्ती, ता. नगर) यांनी गुरूवारी (6 जून) दुपारी फिर्याद दिली आहे. संदीप हा त्याचा मुलगा पार्थचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. तसेच त्याला शिवीगाळ करून मारहाण देखील करत होता.
त्याच्या याच जाचाला कंटाळून पार्थने 29 मे रोजी पावणे चार ते सव्वा पाचच्या दरम्यान राहत्या घरी आदर्शनगर, विद्या कॉलनी, कल्याण रस्ता येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संदीप विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.