अहमदनगर-प्रसृती झाल्यानंतर जन्माला आलेले पुरूष जातीचे नवजात बाळ सोडून मातेने पलायन केल्याची घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन गणेश आवचर (वय 30 रा. मिरजगाव ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या मातेचे नाव आहे.
याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिसेविका सुरेखा भुजंगराव आंधळे यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास कुंदन आवचर ही जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आली होती. तिची प्रसुती झाल्यानंतर तिने पुरूष जातीच्या नवजात बाळाला जन्म दिला. पावणे बाराच्या सुमारास प्रसुती कक्षात खूप गर्दी झाली होती. त्या गर्दीचा फायदा घेत कुंदन आवचर ही कोणाला काहीही न सांगता नवजात बाळाला घेऊन गेली.
दरम्यान, 12 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नवजात पुरूष जातीचे बाळ मिळून आले. सदरचे बाळ कुंदन आवचर हिचे असल्याचे समोर आल्याने तिच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.