इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सराला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर वैजापूर, येवल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील तोफखाना आणि संगमनेरातही गुन्हा दाखल करण्यात आला.
रामगिरी महाराज (मठाधिपती, सद्गुरु रामगिरी महाराज संस्थान श्री शेत्र गोदावरी धाम बेट, श्रीरामपूर) यांनी मौजे पंचाळे तालुका
सिन्नर जि. नाशिक येथे 15 ऑगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या जाहीर प्रवचनात सर्व लोकांसमक्ष व लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहे. नगर शहरात शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
संध्याकाळी उशीरा साहेबान अन्सार जहागीरदार (रा. राहणार बेलदार गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या 302, 353 (2) कलमान्वये रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी रात्री मोबाईलच्या व्हाट्सअप वर मित्राने पाठवलेल्या मेसेजमध्ये रामगिरी महाराज ईस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पाहिले. यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावले आहेत. रामगिरी महाराज यांनी हे वक्तव्य मौजे पंचाळे तालुका सिन्नर जि. नाशिक येथे केल्याचे समजले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. सदर गुन्हा एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशन (जि. नाशिक) येथे वर्ग करण्यात आला आहे.
आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मागनि चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, या दृष्टीकोनातून आम्ही जे काही बोललो ते बोललो आहोत. आमचा उद्देश हाच आहे, हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावं. असंघटितपणामुळे आजपर्यंत फायदा घेतला गेलाय. जे असेल ते असेल. गुन्हा दाखल झाला असेल नोटीस येईल तेव्हा बघू, अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराज यांनी दिली.
बांगलादेशात जो प्रकार घडला, आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहेत. आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की, बांगलादेशात एका महिलेवर तब्बल ३० जणांनी बलात्कार केला. कोटी दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की, आम्हाला भारतात आश्रय द्या. त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की, हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं. बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको. अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो. त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे, असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.