नगर – सावेडीतील खासगी क्लासेसमध्ये १७ वर्षीय मुलीसोबत तेथील शिक्षकानेच छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर हे प्रकरण तोफखाना पोलिसात गेले. पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून घेत शिक्षकाविरोधात विनयभंग, पोसो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. २७) दुपारी सोनानगर चौकातील खासगी लासेसमध्ये ही घटना घडली. सत्यम नवनाथ कुटे (मुळ रा. कुटे वस्ती, देडगाव ता. नेवासा, हल्ली रा. वैदुवाडी, सावेडी, नगर) असे छेडछाड करणार्या शिक्षकाचे नाव आहे.
नगर शहरात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी (वय १७) शहरातीलच एका विद्यालयात शिक्षण घेते. तसेच ती सोनानगर चौकातील खासगी लासेससाठी जात असते. बुधवारी दुपारी ती लासमध्ये गेली असता तेथे सत्यम कुटे हा एकटाच उपस्थित होता. त्याने फिर्यादीकडे प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीने त्याला चांगलेच खडे बोल सुनावले. तरी देखील त्याने फिर्यादीचा हात पकडून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत घर गाठले. घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून कुटे विरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक जे.सी.मुजावर करीत आहेत.
नगर शहरात खाजगी क्लासेसमध्ये युवतीची छेडछाड, शिक्षकावर गुन्हा दाखल
- Advertisement -