नगर – मंदिरावर केलेल्या लाईट डेकोरेशनचे साहित्य काढण्यासाठी कळसावर चढलेल्या कामगार युवकाचा पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची घटना नगर जवळील नागरदेवळे गावात घडली आहे. शरद दौलत शेलार (वय ३२, रा. अग्रवाल गोडावून जवळ, बुरूडगाव रोड) असे मयताचे नाव आहे. निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत भिंगार कम्प पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नागरदेवळे गावात असलेल्या नागेश्वर मंदिर परिसरात बुधवारी (दि.२८) सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली आहे. श्रावण महिन्यानिमित्त नागेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. हे काम बुरूडगाव रोड वरील फुलसौंदर मळा येथील विठ्ठल शिंगवी व अक्षय विठ्ठल शिंगवी या लाईट डेकोरेशन व्यावसायिकांनी घेतलेले होते. त्यांच्या कडे मयत शरद शेलार हा कामाला होता. बुधवारी (दि.२८) सकाळी १० च्या सुमारास मंदिरावर केलेल्या लाईट डेकोरेशनचे साहित्य काढण्यासाठी शिंगवी यांनी शरद शेलार यास कळसावर जाण्यास सांगितले.
तो कळसावर चढल्यानंतर काम करत असताना पाय घसरून मंदिराच्या कळसावरून थेट खाली जमिनीवर कोसळला. उंचावरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला त्याचा मित्र अक्षय शिंदे (रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) याने तातडीने खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला असल्याचे मेडिकल ऑफिसर डॉ. बटुळे यांनी घोषित केले.
या बाबतची माहिती मिळाल्यावर भिंगार कम्प पोलिसांनी बुधवारी (दि.२८) सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र मयत शरद शेलार याचा भाऊ संतोष दौलत शेलार याने गुरुवारी (दि.२९) सायंकाळी भिंगार कम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, सदर मृत्यू हा विठ्ठल शिंगवी व अक्षय विठ्ठल शिंगवी यांच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. त्यांनी मयत शरद यास मंदिराच्या कळसावर कामासाठी जाण्यास सांगताना सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली नसल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध बी.एन.एस.२०२३ चे कलम १०६ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे.