अहमदनगर -गोरगरीब लोकांच्या लाखो रूपयांच्या ठेवी घेवून नंतर पैसे परत देण्यास टाळाटाळ करत ठेवीदारांची लाखो रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी श्रीरामपूर शहरातील श्रीसंत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, संचालकांसह १४ जणांवर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सनी किशोर आंबिलवादे (वय-३०, रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, संत नरहरी पतसंस्थेचा व्यवहार व संचालक मंडळाशी असलेले नातेसंबंध तसेच समाजबांधव यामुळे माझे वडील किशोर मुरलीधर आंबीलवादे यांनी या काही रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली. मी व माझा भाऊ लहान असल्याने आणि शेती १५-२० कि.मी. लांब असल्याने वडीलांनी शेती विकून त्याचे मिळालेले पैसे आजारपणावर खर्च करून राहीलेली रक्कम मुदत ठेव म्हणून या नरहरी पतसंस्थेत २००६ मध्ये ठेवली होती.
त्यानंतर वडील व आई दोघांचे निधन झाल्यानंतर पतसंस्थेच्या संचालक मंडळाने वडीलांच्या नावावर असलेल्या मुदत ठेव पावत्या माझ्या भावाच्या नावावर केल्या. वेगवेगळ्या मुदत ठेव पावत्यांची एकूण रक्कम ही ४ लाख २३ हजार २१६ एवढी होती पावत्यांची मुदत संपल्यानंतर आणि आम्हाला पैशांची गरज असल्याने आम्ही पतसंस्थेमध्ये पावत्यांची जमा झालेली रक्कम मागण्यासाठी गेलो असता संचालक मंडळाने चालढकल सुरु केली. तसेच माझे ओळखीचे ठेवीदार सुभाष सिताराम लांडगे, पांडू नवनाथ धनवटे, सचिन विष्णू कांबळे, अब्बास लालखाँ पठाण यांच्याही ठेवी या पतसंस्थेत अडकलेल्या आहेत. संस्थेच्या संचालक मंडळाने आमच्या ठेवींची रक्कम परत न करता ठेवीदारांची फसवणूक केली आहे, असे सनी किशोर आंबीलवादे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सदर फिर्यादीवरून पोलिसांनी संस्थापक व चेअरमन सोमनाथ रघुनाथ महाले, संचालक निखील विजय नागरे, आशिष सुरेश क्षिरसागर, उमेश गणपत मैड, प्रसाद दिलीप नागरे, अनंत विठ्ठलराव निकम, संजीव शामराव साळवे, सौ. स्नेहलता प्रकाश कुलथे, सौ.संगिता आनंद माळवे, सचिन वसंतराव आहिरराव, गणेश विठ्ठलराव भिसे, विजय रामभाऊ नागरे, प्रकाश बाबुराव कुलथे, अभिजीत राजन माळवे या १४ जणांच्याविरोधात ठेवीदारांची तसेच संस्थेची फसवणूक करून सदर रक्कमेचा अपहार केला म्हणून भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
संत नरहरी पतसंस्थेचे अनेक ठेवीदार पैसे मिळत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत होते. पोलिसांना अनेकदा निवेदनं दिली. त्यानंतर मंत्र्यांनाही निवेदनं दिली. नव्हेत्तर संस्थेच्या चेअरमनच्या दुकानाच्याबाहेर भर पावसात या ठेवीदारांनी ठेवीचे पैसे परत मिळावे म्हणून आंदोलनही केले होते. परंतु, तरीही या पतसंस्थेने ठेवीदारांच्या ठेवी परत न केल्याने ठेवीदार संतप्त झाले होते. अखेर याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.