अहमदनगर-माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीने वनजमिनीवर ताबा व झाडे तोडून इमारत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. याबाबत चौकशी सुरू झाली असून लवकरच गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांची राजकीय अडचण होणार असून ते काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
मुळा एज्युकेशन सोसायटी 2018 मध्ये हरित लवादाकडे तक्रार झाल्याने चर्चेत आली होती. लवादाच्या निर्णयानंतर संस्था अडचणीत आली होती. त्याच प्रकरणात तक्रार झाल्याचे समजते. संस्थेने वनजमिनी ताब्यात घेऊन झाडांची कत्तल करत इमारत बांधणे, बनावट कागदपत्रे तयार करणे असे आक्षेप नोंदवत एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष व विश्वस्तांवर कारवाईची मागणी कुलाबा पोलीसांना दिलेल्या एका तक्रार अर्जात केल्याचे समजते. हा अर्ज एक-दीड महिन्यापूर्वी देण्यात आला, मात्र आता याप्रकरणी माहिती संकलन व चौकशी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेत आला.
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून गडाखांचा संघर्ष सुरू आहे. त्यांना सरकारने कोणताही विकासनिधी न दिल्याने त्यांची आधीच राजकीय कोंडी झालेली आहे. दूध संघावर केस, मुळा सहकारी साखर कारखान्याला कर्जहमी नाकारणे, मुळा बँकेची चौकशी अशा प्रकरणांमुळे गडाखांविरोधात आधीच घेराबंदी झालेली असताना मुळा एज्युकेशनचे प्रकरण ऐरणीवर आल्यास कोंडी अधिकच वाढणार आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आ.गडाख मतदारसंघात सक्रीय आहेत. थेट जनतेच्या दारी पोहचत त्यांनी सुरू केलेला संवाद चर्चेत असताना चौकशांच्या माध्यमातून त्यांची कोंडी वाढवण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे या स्थितीचा सामना करण्यासाठी गडाख गट काय भुमिका घेणार? आगामी निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल का, याची उत्सुकता वाढणार आहे.
आता हे प्रकरण जर ऐन वेळेला समोर आलं तर मोठी अडचण होऊ शकते. गडाख यांची भूमिका नेमकी कशी असणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.