Wednesday, November 29, 2023

जिल्ह्यात कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी समिती गठीत, जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ कक्ष’

जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वीत

तालुकास्तरावर ही कक्षांची स्थापन

अहमदनगर, दि.५ नोव्हेंबर (जिमाका)- आजपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला.

मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात “स्वतंत्र कक्ष” स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेबर पासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वित करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय कक्ष :-

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कक्ष स्थापन करण्याचे आदेश जारी केला आहे‌. निवासी उपजिल्हाधिकारी या कक्षाचे सदस्य सचिव असणार आहेत. तर सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगरपालिका प्रशासन) हे असणार आहेत.

तालुकास्तरीय कक्ष :-

तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी नायब तहसीलदार हे सदस्य सचिव असणार आहेत. सदस्य सचिव म्हणून गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) हे असणार आहेत.

तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी संपूर्ण अहमदनगर महसूल प्रशासन आजपासून कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी श्री.सालीमठ स्वतः बारकाईने या कामावर लक्ष ठेवणार आहेत.

समितीचे कामकाज :-

महसूल अभिलेखे खसारा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही. नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन वही व सातबारा उतारे. १९५१ नमुना नंबर १, नमुना नंबर २, हक्क नोंद, जन्म-मृत्यु रजिस्टर गाव नमुना क्रमांक १४,शैक्षणिक अभिलेखे प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अभिलेखे अनुन्याप्ती नोंदवहया, मळी नोंदवही, ताडी नोंदवही अस्थापना अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेखे रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही, पोलीस विभाग गाववारी, गोपनीय रजिस्टर C1, C2. क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व एफ आयआर रजिस्टर, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी खरेदी खत नोंदणी रजिस्टर, डे बुक करार खत, साठेखत, इसार पावती भाडे चिट्ठी, ठोके पत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्र, इच्छापत्रक, तडजोड पत्र ई दस्त, भूमि अभिलेख विभाग पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासेस रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी सैनिकांच्या नोंदी, जिल्हा वफ्फ अधिकारी यांचे कडील मुंतखब, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशील सन १९६७ पूर्वीचे कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील
जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे आदींची तपासणी करण्यात येणार आहे.

वरील अभिलेख तसेच तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील १९६७ पुर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी तपासणी करावयाची आहे. त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्यांचे स्कॅनिंग करून जतन करावे तसेच तपासलेले कागदपत्र व आढळलेल्या नोंदी यांची माहिती दैनंदिन स्वरुपात जिल्हा समितीने प्राप्त करुन घेवून जिल्हा समिती विभागीय समितीस तसेच जिल्ह्याचे संकेतस्थळावर अद्ययावत करावी सदस्यांनी तालुका कक्षास भेट देवून चाललेल्या कामाची प्रगती तपासावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत उपरोक्त सर्व अभिलेख शोधणे करीत प्रशासकीय स्तरावरील अभिलेख शोधणे बाबत नियोजन करण्यात आलेले असून‌ नागरिकांना त्यांचे कडील १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तसेच तालुका स्तरावरील कक्षात दाखल करता येतील.

नागरिकांनी त्यांच्याकडील‌१९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख (मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत असल्यास सक्षम भाषांतरकार यांचे कडून भाषांतरित) जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तसेच तालुका स्तरावरील कक्षात दाखल करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: