बनावट टीईटी प्रमाणपत्र काढत शासनची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या उपशिक्षण अधिकारी राजश्री मधुकर घोडके यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सी. एस. धनवळे, नासिर ख्वाजालाल खान, शेख दानीश जब्बार खान इम्रान अय्युब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ए.टी.यु. जदिद उर्दू प्राथमिक शाळा नगर या शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान यांनी 2020 मध्ये दोन शिक्षक शेख जब्बार व खान इम्रान अय्युब यांचा वैयक्तीक मान्यतेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. प्रस्तावासोबत शिक्षक पात्रता परिक्षा 2018 चे प्रमाणपत्रच्या झेरॉक्स जोडण्यात आल्याने मुळ प्रमाणपत्राची मागणी आयुक्त परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे करण्यात आली. मात्र, याबाबत काहीच माहिती न नसल्याने हे संबंधीत शिक्षकांचे प्रमाणपत्र बनावट असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या शिक्षकांना तत्कालीन शिक्षणाधिकारी सय्यद यांनी 2021 मध्ये शिक्षण सेवक व सहशिक्षक म्हणून मान्यता दिलेली आहे. संबंधीत मान्यता आदेशाचे आवक जावक रजिष्टर तसेच टिपणीमध्ये नोंद नसल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. दरम्यान या दोन शिक्षकांच्या पदाच्या मान्यतेसाठी, तसेच शालर्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.
सुनावणी दरम्यान संबंधीत शिक्षकाच्या मान्यता आदेशाच्या आवक जावकमध्ये नोंद नसून संबंधीतांचे टीईटी परिक्षेचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. खान इम्रान अय्युब यांच्यावर बनावट प्रमाणपत्रप्रकरणी सायबर क्राईम पुणे यांच्यावर गुन्हा दाखल असून याप्रकरणात संबंधीत शिक्षकासह अन्य एका शिक्षकांने, तसेच मुख्याध्यापक खान यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून फसवणूक केली आहे. तसेच जिल्हा परिषदेतील लिपीक धनवळे यांनी देखील केली असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सुचना पुण सायबर पोलीसांनी केलेल्या आहेत. या प्रकारात तत्कालीन शिक्षणाधिकारी सय्यद यांनी देखील कायदेशीर पध्दतीचा अवलंब न करता आवकजावक रजिष्टरला नोंद न घेता संबंधीत शिक्षकांच्या वैयक्तीक मान्याता दिलेल्या आहेत. यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनूसार तत्कालीन शिक्षणाधिकारी सय्यद, लिपिक धनवळे, नासिर ख्वाजालाल खान ए. टी.यु. जदीद उर्दु प्राथमिक शाळा अहमदनगर येथील मुख्याध्यापक, शेख जब्बार, खान इम्रान अय्युब शिक्षक यांनी संगनमताने वैयक्तीक मान्याता घेतल्याप्रकरणी तसेच टीईटी प्रमाणपत्र बनावट सादर केल्या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.