लग्न समारंभामध्ये वऱ्हाडी म्हणून शिरून हात साफ करणाऱ्या चोरट्यांची टोळी मिरजगाव पोलिसांनी सुमारे ७ ते ८ किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून गाडीसह ७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतोष प्रभाकर खरात ( रा. भट्टेवाडी, ता. जामखेड), आकाश रमेश गायकवाड ( रा. गोरोबा टॉकीज, जामखेड), किरण आजिनाथ गायकवाड, रवी शिवाजी खवळे, संतोष शिवाजी गायकवाड, विशाल हरीश गायकवाड (रा सर्व. मिलिंद नगर, जामखेड), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरामध्ये असणाऱ्या आत्मगिरी लॉन्स मांदळी, शिवपार्वती मंगल कार्यालय थेरगाव येथे लग्न समारंभा मधून धाडसी चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळाली की, काहीजण पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडी मधून दरोडा टाकण्याच्या तयारीत असून ते मिरजगाव येथील क्रांती चौक येथून आष्टी कडे जाणार आहेत. स.पो.नि.दिवटे यांनी तत्काळ पोलीस पथक घेऊन क्रांती चौकामध्ये नाकाबंदी केली.
दरम्यान काही वेळाने कोकण गावच्या दिशेने एक संशयित स्कार्पिओ येताना दिसताच तिला थांबवण्यासाठी पोलीस पथकाने हात केला असता स्कार्पिओ गाडी नाकाबंदी तोडून कडा रोडने पळून गेली. पोलीस पथकाने या स्कार्पिओचा सुमारे सात ते आठ किलोमीटर पाठलाग केला. स्पीड बेकर वर ती स्कार्पिओ पकडली. गाडीची झडती घेतली असता, लोखंडी सुरा, दोन लोखंडी गज, एक बांबूचे दांडके व मिरची पावडर हे साहित्य आढळून आले. गाडीतील सहा जणांना पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता या चोरट्यांनी मिरजगाव परिसरातील मंगल कार्यालयामध्ये चोरी केल्याची कबुली दिली. या चोरट्यांकडून २४ हजार रुपयांची रोकड, ९ ग्रॅम वजनाचे सोने, काही मोबाईल व स्कार्पिओ गाडी क्रमांक (एमएच १२ एन ई ८९०६) असा एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार सुनील माळशिखरे, गणेश ठोंबरे, विकास चंदन, सुनील खैरे, गोकुळदास पळसे, गंगाधर आंग्रे, राजेंद्र गाडे, राहुल सपट यांच्या पथकाने केली.