अहमदनगर-मित्र-मैत्रिणींसोबत विळद (ता. नगर) शिवारातील गवळीवाडा धबधब्यावर गेलेल्या अल्पवयीन मुलीचा (वय 17) पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.समीक्षा लाला कुसमुडे (वय 17 रा. नवनागापुर) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समीक्षा ही गुरूवारी (26 सप्टेंबर) दुपारी तिच्या तीन ते चार मित्र- मैत्रिणींसोबत विळद शिवारातील गवळीवाडा धबधब्यावर फिरण्यासाठी गेली होती. ते सर्व जण धबधब्याजवळ असताना समीक्षा एका मोठ्या दगडावर चढली मात्र त्या दगडावर शेवाळ असल्याने तिचा पाय घसरला ती खोल पाण्यात पडली व त्यात तिचा बुडून मृत्यू झाला.
सदरची घटना तिच्या सोबतच्या मित्र- मैत्रिणींनी तिच्या घरी सांगितली. मुलीचा शोध घेतला परंतू पाणी जास्त असल्याने ती मिळून आली नाही. नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिसांना काल, शुक्रवारी सकाळी माहिती दिली.
सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता समीक्षाचा मृतदेह मिळून आला. मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.