अहमदनगर -राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थीनीने दि. १४ जून रोजी सकाळी टाकळीमिया परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील जागृती विश्वास शिंदे हिने नुकतेच ११ वीच्या वर्गात प्रवेश घेऊन महाविद्यालययीन शिक्षण सुरु केले होते. जागृती ही क्लासला जात येत असताना काही रोडरोमिओ तिची छेड काढत होते. याबाबत तिने आईला सांगितले. त्यावेळी तिच्या आईने सदर रोडरोमिओंना भेटून माझ्या मुलीची छेडछाड करु नका, तिला त्रास देऊ नका, तिला परत फोन करु नका अशी समज दिली होती. त्यानंतरही रोडरोमिओं कडून तिची छेडछाड सुरुच होती.
जागृती ही रोडरोमिओंच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळून गेली होती. दि. १४ जून रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. नंतर तिने तालुक्यातील टाकळीमिया शिवारातील रेल्वे बोगद्या जवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी जागृती हिची आई सुरेखा विश्वास शिंदे यांनी काल राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन देवळाली प्रवरा येथील दोन अल्पवयीन मुलांवर भा. दं. वि. कलम ३०६, ३४ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकाने दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहे.