सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना शरद पवार यांनी दिला शब्द
गावगाड्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत घेणार बैठक
अहमदनगर (प्रतिनिधी)- गावगाड्यांच्या मागण्या रास्त असून, मुख्यमंत्र्यांसमवेत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. गावगाड्यांच्या विविध प्रश्न सुटण्यासाठी व त्यांचे प्रश्न राज्य सरकारकडे मांडण्यासाठी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली असता त्यांनी हा शब्द दिला असल्याची माहिती सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे यांनी दिली.
सरपंच परिषदेने राज्य सरकारला गावगाड्यांच्या अनेक मागण्यांचे निवेदन दिले. मात्र सरकार ग्रामीण भागातील प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील सरपंचांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देत आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातून आंदोलनाची सुरुवात करत सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारिणीने राज्यातील सर्व पक्षप्रमुखांच्या भेटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रमुखांकडे परिषदेच्या मागण्या मांडून त्याबाबत सरकारकडे आपण आग्रह धरावा अशी मागणी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे येथील मोदीबाग येथे परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली 35 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन गावगाड्यांच्या समस्येचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी आपण केलेल्या मागण्या रास्त आहेत, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सरपंच परिषदेची संयुक्त बैठक लावून आणि तेथे ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मी या मागण्यांसाठी स्वतः तेथे उपस्थित राहील असा शब्द शरद पवार यांनी सरपंच परिषदेचे शिष्टमंडळाला दिला.
सरपंच परिषदेचे प्रामुख्याने सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना 10 हजार पर्यंत मानधन वाढ, पेन्शन, मोफत एसटी सेवा, मंत्रालयात कायम प्रवेश पास, मुंबई येथे सरपंच भवन, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सरपंच कक्ष, 15 लाखाच्या आतील विकास कामांचा मक्ता ग्रामपंचायतांना द्यावा, ग्रामपंचायतसाठी आपत्कालीन व राखीव निधीसाठी 10 लाख तरतूद, ग्रामीण आवास योजनेत घर बांधणीस अडीच लाख आदी मागण्यांचा समवेश आहे.
सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाशी पवार यांनी एक तास चर्चा केली. प्रत्येक विषय समजून घेतला. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, राज्य विश्वस्त तथा कोषाध्यक्ष आनंद जाधव, राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे, राज्य प्रसिद्ध प्रमुख संजय बापू जगदाळे, राज्य कोअर कमिटी सदस्य जे.डी. टेमगिरे, अरुणभाऊ कापसे, संजय शेलार, शत्रुघन धनवडे, अंबादास गुजर, गोविंद गायकवाड, ॲड. दयानंद पाटील, अभिजीत पाटील, युवराज पाटील, लखन पाटील, संदीप कांबळे, पंढरीनाथ भोपळे, जी.डी. गुरव, जोशना पाटील, शिवाजी कांबळे (करवीर), बी.एम. पाटील (भडगावकर), शिवाजी पाटील (कासारी), जयसिंग पाटील (सोनगे) इत्यादींचा समावेश होता.
राज्यातील सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत होणार बैठक
- Advertisement -