अल्पवयीन मुलीवर युवकाने वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून तिने दिलेल्या जबाबावरून युवकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार दत्तात्रय राहिंज (वय २१, रा. म्हसोबा चौक, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ओंकार राहिंज याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरातील एका उपनगरात राहते. ती एका शाळेत शिक्षण घेते. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिची ओंकार सोबत ओळख झाली होती. त्यावेळी ओंकारने तिच्याकडे प्रेमाची मागणी केली असता त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले.
दि.५ नोव्हेंबर रोजी ओंकारने त्याच्याकडील चारचाकी वाहनातून फिर्यादीला घेऊन गेला व वाहनातच तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी पुन्हा ओंकार याने उपनगरातील एका रूममध्ये पीडितेवर अत्याचार केले. दि.५ जानेवारी रोजी ओंकार याने पीडितेला मिरावली पहाड परिसरात नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर ओंकार पीडितेला कधीही भेटण्यासाठी आला नाही व त्याचा नंबर देखील पीडितेकडे नव्हता.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात पीडितेला त्रास सुरू झाल्याने तिच्या आईने दि.५ फेब्रुवारी रोजी एका सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केली असता पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले. तिला पुढील उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अमोल भारती करीत आहेत.