सुरेश पालवे यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी
करंजी/तिसगाव (१५ फेब्रुवारी) पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील रहिवासी असलेले सुरेश पांडुरंग पालवे (वय४२) यांची एक महिन्यापासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर आज अयशस्वी ठरली. पालवे हे गेल्या एक महिन्यापासून गंभीर आजारी असल्याने त्यांच्यावर सुरुवातीला अहमदनगर येथील नामांकित रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले व सध्या पुणे येथील नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने पुणे येथील रुग्णालयातच आज अखेर त्यांचे दुःखद निधन झाले.
सुरेश पांडुरंग पालवे हे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील नैनगुडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. आदर्श शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची गडचिरोली जिल्ह्यात ओळख होती. अत्यंत मनमिळावू व मित्रांच्या गळ्यातील ताईत असलेले सुरेश पांडुरंग पालवे यांचे आकस्मिक निधन झाल्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. सुरेश पालवे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे. विशेष म्हणजे आज १५ फेब्रुवारीला सुरेश पालवे यांचा ४३ वा वाढदिवस व वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.