अहमदनगर -१० डिसेंबर रोजी मोहन रक्ताटे (रा. बुऱ्हाणनगर) यांनी बँकेचे हप्ते घ चिचोंडी पाटील येथे विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकी गाडीमध्ये चिट्ठी सापडली, त्यामध्ये एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत मी मेल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती.
सदरची घटना मनसेचे नेते वसंत तात्या मोरे यांना समजले असता त्यांनी त्वरित दिवंगत मोहन रक्ताटे यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला तसेच कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वस्त केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की,
इतक्या अपेक्षा माझ्याकडून जनता करत आहे हे खुप ओझे होत आहे. दिवंगत रक्ताटे हे अत्यंत प्रामाणिक व शांत स्वभावाचे असल्याचे समजले. आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी एका खाजगी बँकेकडून कर्ज घेऊन टेम्पो चालवीत होते. बँकेचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत होते. परंतु व्यवसायातील मंदी तसेच काही कारणांमुळे त्यांचे काही हप्ते थकीत होते. याच हप्त्यांपोटी बँकेच्या रिकव्हरी कर्मचाऱ्यांकडून त्रास देण्यास सुरुवात झाली होती. याच काळात रीकव्हरी कर्मचाऱ्यांकडून त्यांची गाडी भाळवणी येथून ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर दिवंगत रक्ताटे यांना तुमचा टेम्पो विकला असल्याचे सांगितले. त्यानंतर रक्ताटे यांनी आत्महत्या केली. आज रक्ताटे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता टेम्पो हा नगर येथील रिकव्हरी गोडाऊन मध्येच असल्याचे कळले. त्यामुळे बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून रक्ताटे यांनी आपले जीवन संपविल्याचे समजते. मरताना त्यांनी माझ्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली त्यामध्ये “तात्या” मी मेल्यानंतर ना मला न्याय मिळवून द्या अशी हाक मारून चिठ्ठी मध्ये दोन-तीन व्यक्तींची नावे लिहिलेली आहेत. आम्ही आता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच बँकेच्या शाखा व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करून या प्रकरणातील दोषी आरोपींवर 304 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरमध्ये बँकेच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या, चिठ्ठीत मनसे नगरसेवक वसंत मोरेंचे नाव आल्याने सर्वच हैराण
- Advertisement -