अहमदनगर-डॉक्टर असलेल्या महिलेच्या घरातील हॉलमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचा अॅक्सेस तरुणाने स्वत:कडे घेऊन त्यांची बदनामी करून गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. उपनगरात राहत असलेल्या पीडित महिला डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर नंदकिशोर वाव्हळ (वय 28 रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या पतीपासून घटस्फोट घेतला असल्याने त्या मुलासह उपनगरात राहतात. त्यांचे उपनगरातच भाडोत्री गाळ्यामध्ये क्लिनीक आहे. मागील एक वर्षापूर्वी (सन 2023) फिर्यादी त्यांच्या क्लिनीकवरून घरी जात असताना मयुरने त्यांचा पाठलाग केला होता व तुमच्यावर प्रेम असल्याचे बोलला होता. त्यावेळी फिर्यादीने त्याला जाब विचारला असता त्याने त्यांना शिवीगाळ केली होती.
तसेच ऑगस्ट 2024 मध्ये त्याने एका व्यक्तीबरोबर फिर्यादीचे प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्यांची बदनामी केली होती. 29 सप्टेंबर 2024 रोजी रात्री नऊच्या सुमारास मयुर हा फिर्यादीच्या क्लिनीकमध्ये आला व त्याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादीच्या घरातील हॉलमध्ये बसविलेल्या कॅमेर्याचे अॅक्सेस दाखविले व मला तु घरात काय करते हे सर्व दिसते असे म्हणाला यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.