अहमदनगर -मयताच्या टाळू वरील लोणी खाण्याचा संताप जनक प्रकार नगर जिल्ह्यातील बाभळेश्वर (ता. राहाता) येथील पोस्ट ऑफिस मध्ये उघडकीस आला आहे. या ऑफिस मध्ये कार्यरत सब पोस्ट मास्तरने पोस्टात आर डी खाते असताना मयत झालेल्या २ खातेदारांच्या खात्यातून १ लाख १ हजार १८६ रुपये एवढी रक्कम परस्पर स्वताच्या खात्यात वळवून त्या रकमेची अफरातफर केली असल्याचे समोर आले आहे.
वाहिद इब्राहीम पठाण असे या सब पोस्ट मास्तरचे नाव आहे. त्याने मयत झालेले खातेदार श्रीमती चंद्रकला साहेबराव ढाकणे व मुकुंद साहेबराव पवार यांच्या खात्यातून १ लाख १ हजार १८६ रुपये एवढी रक्कम परस्पर स्वताच्या खात्यात वळवून त्या रकमेची अफरातफर केली.
ही बाब उघडकीस आल्यावर श्रीरामपूर विभागाचे सहाय्यक डाकघर अधीक्षक रविकुमार पांडुरंग झावरे यांनी आरोपी सब पोस्ट मास्तर वाहिद पठाण याच्या विरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पठाण विरुद्ध भा.दं.वी.कलम ४०९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.