शेताच्या कडेला असलेल्या झोपडीच्या बाहेर आपल्या भावाबरोबर बसलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेऊन ठार मारल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज गावच्या शिवारात शुक्रवारी (दि.१९) रात्री घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
अजनूज येथे अरुण गायकवाड नावाच्या एका ऊसतोड मजुराच्या लक्ष्मी (वय ३) नावाच्या चिमुकलीवर बिबट्याने हा हल्ला केला. बिबट्याने उचलून या मुलीला उसाच्या शेतात नेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिक मुलीच्या शोधासाठी धावले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर ती मुलगी गंभीर जखमी अवस्थेत शेतात पडलेली आढळून आली. तीला तातडीने उपचारार्थ श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.
ऊस तोडणी कामगाराची लहान मुलीस बिबट्याने उचलून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या परिसरात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेले असुन गेल्या महिनाभरापासुन या भागात बिबट्यांचा वावर आहे. बिबट्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता नागरिक व्यक्त करतात. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.